सायबर गुन्हेगारांचा ज्येष्ठ नागरिकावर डल्ला : खात्यातून ३.५९ लाख रुपये लंपास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यावर डोळा ठेवत त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची बचत काही मिनिटांतच हडप केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथे उघडकीस आली आहे. अज्ञात सायबर भामट्यांनी ६२ वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ५९ हजार ८९८ रुपये ३९ पैसे परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मधुकर पंढरी राखुंडे (६२) , रा. गणपती वॉर्ड, बल्लारपूर हे मजुरी व सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे बँक ऑफ बडोदाच्या बल्लारपूर शाखेत खाते असून त्यामध्ये ते आपल्या मेहनतीची कमाई जमा करत होते.
२४ मे रोजी मुलीसोबत पुण्याकडे प्रवास करत असताना त्यांच्या मोबाईलवर संशयास्पद संदेश येण्यास सुरुवात झाली. मुलीच्या लक्षात हा प्रकार आल्याने तिने तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खाते गोठवून घेतले. त्यानंतर १ जून रोजी खाते पुन्हा सुरू करण्यात आले.
मात्र, ३ जून रोजी मोबाईलवरील संदेशांची तपासणी करताना खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तींनी पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे ६२ हजार ९०० रुपये, ९९ हजार रुपये, ९९ हजार रुपये, ४८,९९९.३८ रुपये आणि ४९ हजार ९९९.०१ रुपये अशी एकूण ३ लाख ५९ लाखांहून अधिक रक्कम परस्पर वळती केल्याचे समोर आले.
विशेष बाब म्हणजे, तक्रारदाराकडे कोणतेही एटीएम कार्ड नसून ते गुगल पे, फोनपे किंवा इतर कोणतीही डिजिटल व्यवहार सेवा वापरत नाहीत. तसेच त्यांनी कोणालाही ओटीपी, पिन अथवा बँक खात्याची गोपनीय माहिती दिलेली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नेमकी कोणती युक्ती वापरून व्यवहार केले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच राखुंडे यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार नोंदविली होती. त्यानंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बँक खात्यांशी संबंधित गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




