महत्वाच्या बातम्या

 वर्ध्यात १२ वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या : विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने अत्याचाराचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : खेळण्या-बागडण्याच्या वयात असलेल्या अवघ्या १२ वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी १५ सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, बालिकेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील घरात बालिकेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील तीन ते चार गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच बालिकेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी महाडिक, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद गिरी तसेच रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे यांच्यासह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.

पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची दिशा निश्चित केली असून, आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे.

कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हेलावला -

मृत बालिकेचे कुटुंबीय शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलीचा अशा अमानुष पद्धतीने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस अधिकारी कुटुंबीयांचे जबाब नोंदवत असताना परिसरात केवळ रडण्याचे आवाज आणि हुंदके ऐकू येत होते.

या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निष्पाप बालिकेच्या हत्येने वर्धा जिल्ह्यात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos