महत्वाच्या बातम्या

 स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे २० जुलैपासून वस्त्र चित्रकला लघुउद्योजक प्रशिक्षण


- ३१ दिवसीय मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने बेरोजगार युवक-युवती आणि स्वयंरोजगाराची आवड असलेल्या नागरिकांसाठी वस्त्र चित्रकला लघुउद्योजक या विषयावरील ३१ दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २० जुलै २०२६ पासून सुरू होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये वस्त्र सजावट आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना भरतकाम (Embroidery), हाताने भरतकामाची ओळख व प्रकार, मशीन भरतकाम आणि हातभरतकामातील फरक, आवश्यक साधने, सुया, कापड व धाग्यांची माहिती देण्यात येणार आहे.

तसेच रंगसंगती, डिझाइन निवड, विविध प्रकारचे बेसिक टाके जसे रन स्टिच, बॅक स्टिच, स्टेम स्टिच, क्रॉस स्टिच, हेरिंगबोन, सॅटिन आणि चेन स्टिच यांचे प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय सजावटी टाके, पारंपरिक भरतकाम शैलीमध्ये कंथा, कच्छ, चिकनकारी, कमल कढाई यासह मिरर वर्क, बीड वर्क, झरदोसी, अप्लिक वर्क यांसारख्या कलाप्रकारांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात चित्रकला व डिझाइन निर्मिती, पेंटिंगची मूलतत्त्वे, शेडिंग, हायलाइटिंग, रंगसिद्धांत, टेक्स्चर, फॅब्रिक पेंटिंग, रंग मिसळण्याच्या पद्धती, टाय अँड डाय तंत्र, स्टेन्सिल व बटिक प्रिंटिंग यासह व्यवसायासाठी आवश्यक असलेले बँकिंग व्यवहार, ठेवी, कर्ज योजना, मार्केटिंग व्यवस्थापन, खर्च व किंमत ठरविणे तसेच लेखा व नोंदवही याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

विशेष म्हणजे प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा, नाश्ता, वही, पुस्तके तसेच निवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वयंरोजगार करण्याची इच्छा असणारे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असलेल्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील महिला व पुरुष या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. शिक्षणाची अट दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता बी.ओ.आय. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादूर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संचालक मंगल निमजे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४, ८४२१४७४८३९.





  Print






News - Bhandara




Related Photos