महत्वाच्या बातम्या

 आरोग्य अमृत महोत्सव मधून नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा द्या : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- वर्धा जिल्ह्यात २२ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान अभियान; चार ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य अमृत महोत्सव प्रभावीपणे राबविण्यात यावा. या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त मागील वर्षी संपूर्ण वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी आरोग्य अमृत महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीला आमदार अरुण लखानी आमदार राजेश बकाने आमदार सुमित वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपराग सोमण, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी येथे होणार आरोग्य शिबिरे -

आरोग्य अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी येथे विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वर्धा येथे : २२ ते २४ जुलै दरम्यान बच्छराज सभागृह येथे -
- आर्वी येथे : ३१ जुलै ते १ ऑगस्ट 
- हिंगणघाट येथे : ८ व ९ ऑगस्ट 
- देवळी येथे : १३ व १४ ऑगस्ट 

या शिबिरांमध्ये नागरिकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गंभीर आजार आढळल्यास पुढील उपचारांची व्यवस्था -

आरोग्य तपासणीदरम्यान गंभीर किंवा दुर्धर आजार आढळून आलेल्या रुग्णांना पुढील उपचार मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. तसेच गावागावांमध्ये आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती पोहोचवून अधिकाधिक नागरिकांना शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षी राबविण्यात आलेल्या मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानात ६ हजार ५१५ रुग्णांवर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या अभियानामुळे हजारो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच धर्तीवर यंदा संपूर्ण आरोग्य तपासणीचे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे.

रक्तदान शिबिरे, आयुष्मान कार्ड नोंदणी आणि दिव्यांगांना साहित्य वाटप -

आरोग्य अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिबिरांच्या ठिकाणी विशेष रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

याशिवाय दिव्यांग नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप, आयुष्मान कार्ड नोंदणी, विविध आरोग्य योजनांचा थेट लाभ तसेच गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. 

शिबिरस्थळी रुग्ण नोंदणी, आरोग्य तपासणी, सुविधा वितरण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, बैठक व्यवस्था आणि आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता यांचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार अरुण लखानी, राजेश बकाने आणि सुमित वानखेडे यांनी मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाप्रमाणेच‘आरोग्य अमृत महोत्सव अभियानातूनही सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी शिबिराच्या आयोजनाची तयारी व नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली. आरोग्य विभाग, जीवनोन्नती अभियान आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos