महत्वाच्या बातम्या

 वृक्षलागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनालाही प्राधान्य देणे गरजेचे


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील सर्वच घटकांनी एक येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

व्हिजन ३००  कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत नवोदय विद्यालय सेलूकाटे येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लखानी, आमदार राजेश बकाने, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, विभागीय वन अधिकारी सुहास बढेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, हवामान बदल आणि अल निनो सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर लागवड केलेल्या झाडांचे पुढे काय होते, याचे नियमित मूल्यमापन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अनेकदा मोठ्य  प्रमाणावर वृक्षलागवड झाल्याचे सांगितले जाते. मात्र चार-पाच वर्षांनंतर ती झाडे प्रत्यक्षात दिसून यायला हवीत, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था वृक्षलागवडीसह वृक्षांचे संगोपन आणि संवर्धनाचे काम करीत आहेत. निसर्ग सेवा समितीने गेल्या 25 वर्षांत केलेले कार्य उल्लेखनीय असून वर्धा शहरात दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे 15 हजार कडुलिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली. आज या झाडांचा समाजाला मोठा फायदा होत आहे, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहिमा राबविण्यात आल्या. वृक्षलागवड हा केवळ वन विभागाचा कार्यक्रम नसून सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था आणि इतर सहकारी संघटनांनी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

आमदार अरुण लखानी म्हणाले, अलिकडच्या काळात अतिवृष्टी, दुष्काळ यासारखे प्रश्न भेडसावत असून त्याचे मुळ कारण पर्यावरणीय बदल आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थी आणि युवकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. लोकसहभागाशिवाय पाणी बचत मोहिम यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे लोकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. झाडे लावण्याचा कार्यक्रम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.

आमदार राजेश बकाने म्हणाले की, गेल्या काही वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली असून सामाजिक वनीकरण विभाग आणि कर्मचाऱ्यांनी झाडांच्या संगोपनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक पेड माँ के नाम या संदेशाला प्रतिसाद देत प्रत्येकाने आपल्या घराजवळ किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते चित्रकला व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री डॉ. भोयर व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos