शटर वाकवून किराणा दुकानात चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील कॉलरी रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री किराणा दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत काउंटरमधील सुमारे १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नरेंद्र इंदरचंद तिलोकानी ५४ वर्ष हे कॉलरी रोडवरील छाबडा बिछायत केंद्राशेजारी ममता प्रोव्हिजन नावाचे किराणा दुकान चालवतात. ते दररोज सकाळी दुकान सुरू करून रात्री सुमारे १० वाजेपर्यंत व्यवसाय करतात. ९ जुलै रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर बंद करून घरी प्रस्थान केले.
मात्र १० जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजता त्यांच्या परिचित व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच तिलोकानी तातडीने दुकानाकडे धावले. घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दुकानाचे शटर डाव्या बाजूने सुमारे दोन फूट वाकवून अर्धवट उघडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दुकानाची तपासणी केली असता काउंटरचे लॉक तोडण्यात आल्याचे आढळले. काउंटरमध्ये ठेवलेले ५० रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी ५ हजार रुपयांचे दोन बंडल तसेच १० व २० रुपयांच्या नोटांमधील सुमारे २ हजार ५०० रुपयांची सुटी रोकड, असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणी नरेंद्र तिलोकानी यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




