महत्वाच्या बातम्या

 आरमोरी ५ किमी, वैरागड ११ किमी : मग डोंगरगाव-ठाणेगाव वैरागडला का जोडता?


- सदानंद कुथे यांचा प्रशासकीय रचनेवर आक्षेप

- उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील वैरागड येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या असतानाच, या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या रचनेबाबत आता स्थानिक पातळीवरून तीव्र आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे.

प्रशासनाच्या नव्या प्रस्तावानुसार आरमोरीपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव (भु.) व ठाणेगाव या गावांना चक्क ११ किलोमीटर दूर असलेल्या वैरागड अप्पर तहसील कार्यालयाशी जोडण्यात येत आहे. प्रशासनाच्या या भौगोलिक विसंगतीवर भाजपचे जिल्हा महामंत्री तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सदानंद कुथे यांनी आक्षेप घेतला असून, यासंदर्भात देसाईगंज (वडसा) च्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (महसूल) निवेदन सादर करत डोंगरगाव आणि ठाणेगाव येथील ग्रामस्थांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.  

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार, नवनिर्मित वैरागड अप्पर कार्यालयामध्ये वैरागड आणि पिसेवडधा महसूल मंडळांचा समावेश केला जात आहे. वैरागड महसूल मंडळात डोंगरगाव (भु.) व ठाणेगाव येत असल्याने त्याचा समावेशही अप्पर तहसीलदार कार्यालयात केला जात आहे. मात्र, भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास हे गाव आरमोरी तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या ५ किमी अंतरावर आहे, तर वैरागड हे तब्बल ११ किमी अंतरावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वैरागडपेक्षा आरमोरी अत्यंत सोयीचे आणि जवळचे पडते.  

ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार, मजुरीसाठी जाणे, आठवडी बाजार, मुलांचे शिक्षण, बँक व्यवहार तसेच इतर प्रशासकीय व लहान-सहान कामांकरिता डोंगरगाव आणि ठाणेगाव येथील नागरिकांना नेहमी आरमोरी येथेच जावे लागते. दळणवळणाच्या साधनांचा विचार केला असता, आरमोरीसाठी मुबलक साधने उपलब्ध आहेत, तर वैरागडसाठी दळणवळणाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत डोंगरगाव (भु.) व ठाणेगावला वैरागड अप्पर तहसील कार्यालयाशी जोडणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका सदानंद कुथे यांनी मांडली आहे.  

या समस्येवर तोडगा म्हणून सदानंद कुथे यांनी प्रशासनाला सुचवले आहे की, तलाठी साझा क्र. ०७ अंतर्गत येणारे डोंगरगाव (भु.) आणि ठाणेगाव हे गाव वैरागड तलाठी साझामधून वगळण्यात यावे. या गावांचा समावेश देऊळगाव महसूल मंडळात करून त्यांचे मुख्य तहसील कार्यालय आरमोरीच ठेवण्यात यावे. भौगोलिक परिस्थिती पाहता देऊळगाव महसूल मंडळ आणि आरमोरी तहसील कार्यालय हेच डोंगरगाव आणि ठाणेगाव येथील नागरिकांसाठी सर्वार्थाने सोयीचे ठरेल. प्रशासनाने या जनभावनेचा आणि भौगोलिक सुलभतेचा तातडीने विचार करून आपला आक्षेप स्वीकारावा आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी सदानंद कुथे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos