राष्ट्रीय विद्यार्थी दिन व अभाविपच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली नगर यांच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिन तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त स्वामी विवेकानंद महाविद्यालय, गडचिरोली येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विनोद चव्हाण (पोलीस अधीक्षक, गडचिरोली) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अभाविप प्रदेश सहमंत्री सुजानजी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात सुजानजी चौधरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ वर्षांच्या राष्ट्रनिष्ठ, विद्यार्थीहितैषी आणि समाजाभिमुख कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य, नेतृत्व, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, सकारात्मक दृष्टीकोन आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर जीवनातील प्रत्येक ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख प्रा. विकास चित्ते, नगर उपाध्यक्ष प्रा. अनंता गावंडे, नगर मंत्री संकेत म्हस्के तसेच अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मिळून सुमारे ७५ जणांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली नगरच्या कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नगर मंत्री संकेत म्हस्के यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Gadchiroli




Petrol Price




