सिरोंचा नगरपंचायतीतर्फे सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


- खासदार निधीतील १५ लाखांत साकारणार वाचनालय : विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी व वाचनप्रेमींना मिळणार आधुनिक सुविधा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सिरोंचा नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगराध्यक्षा पदमा सतीश भोगे यांच्या शुभहस्ते फित कापून व नारळ अर्पण करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
सिरोंचा शहरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, संशोधक तसेच सर्वसामान्य वाचनप्रेमींना दर्जेदार वाचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नगरपंचायतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्याबरोबरच बौद्धिक विकासासाठी हे वाचनालय महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सदर सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम खासदार निधीतून मंजूर झालेल्या १५ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. सिरोंचा–सूर्यरावपल्ली मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या नगरपंचायतीच्या जागेवर हे वाचनालय उभारण्यात येणार असून, भविष्यात ते शहरातील विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांसाठी ज्ञानाचे आणि अभ्यासाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास मुख्याधिकारी राजू सिडाम, नगरसेवक सतीश भोगे, रंजित गागापुरवार, सतीश राचर्लावार, जगदीश रालबांडीवार, नरेश अलोणे, इम्तियाज खान, नगरसेविका पदमा पिल्लीवार, पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, माजी नगरसेवक विजय तोकला, सामाजिक कार्यकर्ते मारोती गनपुरपु, पोचम आकुदारी, इझहार शेख, भगवान पिल्लीवार, नगरपंचायत अभियंता धर्मेंद्र घोडे, कर्मचारी सत्यना डुरके, कंत्राटदार राहुल जिठ्ठाबोईना तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सार्वजनिक वाचनालय हे केवळ पुस्तकांचे दालन नसून ज्ञान, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
News - Gadchiroli




Petrol Price




