ओबीसी आरक्षणावरून विसापूरात वाद पेटला : कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरक्षण सोडत जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीवरून सलग दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ओबीसी (ना.मा.प्र.) प्रवर्गासाठी केवळ एकच जागा आरक्षित ठेवल्याच्या मुद्द्यावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभेत जोरदार गदारोळ केला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अखेर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी विसापूर ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांतील १७ वॉर्ड सदस्यपदांच्या आरक्षणासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या सभेत लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जातीसाठी चार, अनुसूचित जमातीसाठी तीन आणि ओबीसी प्रवर्गासाठी केवळ एक जागा आरक्षित राहणार असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी सुजीत चौधरी यांनी दिल्यानंतर सभेत मोठा गदारोळ उडाला. त्यामुळे गुरुवारची सभा रद्द करण्यात आली होती.
यानंतर शुक्रवारी दुपारी पुन्हा सभा घेण्यात आली. मात्र, ओबीसी समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण तापले. नागरिक, इच्छुक उमेदवार आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवत आरक्षण प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यावेळी नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार विनोद निखाते, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, प्राधिकृत अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुजीत चौधरी, ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, ग्रामपंचायत प्रशासक वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येत नसल्याचे स्पष्ट करत आरक्षण सोडत जाहीर केली. शासनाच्या नियमांनुसारच प्रक्रिया राबविण्यात आल्याचे सांगत उपस्थितांना शांततेचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी २७ टक्के आरक्षणाच्या निकषानुसार समाजाला किमान पाच जागा मिळणे अपेक्षित असल्याचा दावा करत केवळ एक जागा आरक्षित करण्यात आल्याने समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली.
सलग दोन दिवस आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे विसापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात हा विषय आणखी चर्चेचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




