महत्वाच्या बातम्या

 एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण : सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत असून, या धोरणाच्या निर्मितीसाठी राज्यभरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि प्रभावी व्हावे यासाठी शासनाने सर्व संबंधित घटकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे. अभिप्राय पाठविताना केवळ त्रोटक मते न पाठविता संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी, अंमलबजावणीची रूपरेषा आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव पाठवावेत. यामुळे धोरण अधिक परिणामकारक आणि एकल महिलांच्या गरजांनुसार तयार होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील एकल महिलांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्वावलंबन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, निवारा आणि कायदेशीर संरक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्षम करण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इच्छुक नागरिकांनी आपले अभिप्राय शासनाच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८२०८५८९१९५ वर पाठवावेत. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना आणि अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना विचार करण्यात येणार  आहे.

राज्यातील सर्व नागरिक, महिला संघटना, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विषयतज्ज्ञांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos