चामोर्शीतील ७ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची धडाकेबाज कारवाई


- आरोपीला १२ तासांत अटक; अवघ्या २८ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी येथे सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. त्यानंतर जलदगतीने तपास पूर्ण करून केवळ २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. महिला व बालकांवरील गंभीर गुन्ह्यांच्या तपासात गडचिरोली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेची ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी चामोर्शी येथील एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या घरावरील स्लॅबच्या भिंतीचा गैरफायदा घेत आरोपी प्रज्वल ऊर्फ नारु सदाशिव भांडेकर (वय २५, रा. चामोर्शी, जि. गडचिरोली) याने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २८०/२०२६ दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४(१), ६५(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियमाच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन समांतर तपास पथके स्थापन करण्यात आली.
भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रज्वल ऊर्फ नारु सदाशिव भांडेकर याचा शोध घेत त्याला घटनेच्या दिवशीच अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी सन २०१९ मध्ये विनयभंग व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचेही निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर सद्य गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आला. आवश्यक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व वैज्ञानिक अहवाल संकलित करून अवघ्या २८ दिवसांत दोषारोपपत्र सक्षम न्यायालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी केला. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, महिला व बालकांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील राहील. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने व जलदगतीने पूर्ण करण्याचे धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
News - Gadchiroli




Petrol Price




