आष्टी येथे ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वच्छता किटचे वाटप : शिक्षणासोबत स्वच्छतेचाही दिला संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागावा या सामाजिक उद्देशाने स्पंदन फाउंडेशन, गडचिरोली, विंग्स ऑफ होप फाउंडेशन, चंद्रपूर तथा श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोहळे पेट्रोल पंप सभागृह, आष्टी येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात आष्टी, इल्लूर, ठाकरी, कुणघाडा, चपराळा, मार्खंडा कंसोबा, अनखोडा, उमरी व चंदणखेडी या गावांतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ८० गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, कंपास बॉक्स, बॉटल आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने स्वच्छता किटचेही वाटप करण्यात आले. या किटमध्ये नेल कटर, नॅपकिन आदी साहित्याचा समावेश होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, नियमित शाळेत उपस्थिती, स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये तसेच प्रत्येक मुलापर्यंत आवश्यक शैक्षणिक साहित्य पोहोचावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था, आष्टी यांच्या पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सरपंच, ग्रामपंचायत आष्टी बेबी बुरांडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा जानवी विशालजी काळे, स्पंदन फाउंडेशन, गडचिरोलीचे डॉ. धम्मदीप बोदेले, पूजा बोदेले, डॉ. सौरभ नागुलवार, डॉ. यज्ञश्री नागुलवार, जानवी लोहंबरे, विंग्स ऑफ होप फाउंडेशन, चंद्रपूरच्या अध्यक्षा डॉ. माधुरी इंगळे, उपाध्यक्षा डॉ. सुषमा लिडर, सचिव तथा श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष पवन रामगिरकार, कोषाध्यक्ष कपिल मसराम, सहसचिव डॉ. नेहा सोनारकर, सदस्य निनाद अवदूत तसेच श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कोषाध्यक्ष देवा बोरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
News - Gadchiroli




Petrol Price




