महत्वाच्या बातम्या

 प्रकल्पग्रस्तांना कायम रोजगार द्या; अन्यथा जमिनी परत करा : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा बिल्टला सज्जड दम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : आष्टी येथील पेपर बिल्ट युनिटमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. करारानुसार प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या, अन्यथा त्यांच्या जमिनी परत करा, असा थेट इशारा त्यांनी बिल्ट व्यवस्थापनाला दिला आहे. चामोर्शी येथील पंचायत समिती सभागृहात आमदार डॉ. नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडलेल्या निर्णायक बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत बिल्ट व्यवस्थापनाने २०१६ पर्यंत दिलेल्या स्थायी व कंत्राटी नोकऱ्यांचा आणि अद्याप नोकरीपासून वंचित असलेल्या १९ कुटुंबांचा तपशील सादर केला. ही जमीन लॉयड्स मेटल्सला हस्तांतरित करण्यापूर्वी या उर्वरित कुटुंबांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. मात्र, आमदार नरोटे यांनी व्यवस्थापनाची ही बाजू खोडून काढली. मूळ करारानुसार प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांना स्थायी नोकरी देणे बंधनकारक असताना, कंपनीने अनेकांना कंत्राटी कामावर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पुढे ठणकावून सांगितले की, शिल्लक १९ कुटुंबांना न्याय न देता परस्पर जमीन हस्तांतरणाचा निर्णय घेणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. जोपर्यंत कंत्राटी कामगारांना आणि वंचित कुटुंबांना स्थायी नोकरीसाठी करारबद्ध केले जात नाही, तोपर्यंत जमिनीवर कोणतेही काम करू दिले जाणार नाही. या न्याय्य हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला येलूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बिल्ट व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजप तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, भाजप तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेशजी अलसावार, नीरजजी रामानुजनवार, माजी जि.प. सदस्य शिल्पा रॉय, शेतकरी मनोहरजी बावनकर, यादवजी वनकर, विनायक बावणे, रामचंद्रजी बावनकर, मारुतीची भोयर, राजेशजी कुडे, मदनजी लांबाडे व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos