अमृत योजना-२ मधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा : दोषींवर कारवाईची युवासेनेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अमृत योजना-२ अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
६ जुलै २०२६ रोजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध पक्षांचे गटनेते तसेच नगरसेवकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात अमृत योजना-२ चे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू असून, वर्क ऑर्डरनुसार काम न करता अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी, मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
इंदिरा नगरसह विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करूनही संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचा आरोपही करण्यात आला असून, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
युवासेनेने म्हटले की, शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना कोट्यवधी रुपयांची अमृत योजना राबवूनही अपेक्षित लाभ मिळत नाही. योजना पूर्ण होण्यास सातत्याने विलंब होत असून निकृष्ट कामांमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारासाठी संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणारे अधिकारी जबाबदार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच, कथित भ्रष्टाचारामुळे शासनाचा निधी वाया जात असल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच अमृत योजना-२ ची उर्वरित कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




