मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ चा शुभारंभ


- दूरदृश्यप्रणालीद्वारे पाणी फाउंडेशनचे सीईओ पराग सोमण यांची उपस्थिती; वर्धा जिल्ह्यात स्पर्धेसाठी ७८६ शेतकरी गट सज्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकरी आणि उमेदमधील महिला शेतकरी भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. या राज्यस्तरीय उद्घाटन कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग सोमण यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान उमेदच्या सहसंचालक वैशाली रसाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, जिल्हा व्यवस्थापक विपणनमनीष कावडे, जिल्हा व्यवस्थापक उपजीविका प्रतिक मुनेश्वर, सुरज बोबडे, पूजा कडे तसेच तालुकास्तरीय अभियान व्यवस्थापक ओमलता भोयर, शुभांगी कोहळे, सचिन सावरकर, निशा मेश्राम, संदीप कांबळे, किशोर हादवे, हेमंत काकडे यांच्यासह सर्व तालुक्यांतील शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेसाठी एकूण ७८६ शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये देवळी - ९७, वर्धा - १०४, सेलू - ९४, आष्टी - ९७, कारंजा - ८३, आर्वी - ११२, हिंगणघाट - ८१ आणि समुद्रपूर - ११८ शेतकरी गटांचा समावेश आहे. या सर्व गटांना उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावपातळीवर कृषी सखी, तर तालुका व जिल्हा स्तरावर उमेद अभियानामार्फत मेंटर्स तयार करण्यात आले असून, हे मेंटर्स प्रत्यक्ष शेतकरी गटांना भेटी देऊन तसेच व्हिडीओ कॉलद्वारे सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
या उपक्रमांतर्गत शेतीपूर्व मशागतीपासून ते पीक व्यवस्थापनापर्यंत विविध विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, योग्य खत व बियाण्यांची निवड, नैसर्गिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब तसेच समूह शेतीचे महत्त्व यांसारख्या बाबींचा समावेश आहे. पाणी फाउंडेशनतर्फे विविध शैक्षणिक चित्रफिती, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.
याशिवाय कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांशी नियमित संवाद साधला जात असून, शेती शिवारात प्रत्यक्ष भेटी देत आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अभियानामुळे जिल्ह्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, समूह शेती आणि शाश्वत कृषी पद्धतींना चालना मिळणार असल्याची माहिती उमेद अभियानाच्या वतीने देण्यात आली.
News - Wardha




Petrol Price




