महत्वाच्या बातम्या

 चार वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना सावधान


- क्लोरफेनिरामाईन मॅलेट-फिनाइलेफ्राईन मिश्रणाच्या औषधांवर निर्बंध; पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणे टाळावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना सर्दी आणि खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांपासून दूर ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या औषध नियामक यंत्रणेने घेतला आहे. क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाइलेफ्राईन हायड्रोक्लोराईड या घटकांचे मिश्रण असलेल्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांचा चार वर्षांखालील मुलांसाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

लहान मुलांना सर्दी, खोकला किंवा नाक बंद होण्याचा त्रास झाल्यानंतर अनेकदा पालक स्वतःहून औषध दुकानातून सिरप घेऊन देतात. मात्र, कमी वयाच्या बालकांमध्ये औषधांचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा औषधांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते.
 
संबंधित फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनवर बंदी -
क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाइलेफ्राईन हायड्रोक्लोराईड यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या विशिष्ट फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांच्या चार वर्षांखालील बालकांमधील वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयाचा उद्देश लहान मुलांना औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे. या निर्णयामुळे संबंधित औषधांचा वापर करताना वयाची मर्यादा काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालकांनी कोणतेही सर्दी-खोकल्याचे औषध खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटक आणि वयोमर्यादा तपासावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

औषधांच्या पॅकेटवर स्पष्ट इशारा - 
संबंधित औषधांच्या पॅकेट आणि लेबलवर हे औषध ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये असा स्पष्ट इशारा छापणे औषध उत्पादक कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे औषध वापरणाऱ्यांना संबंधित औषध कोणत्या वयोगटासाठी योग्य नाही, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे.
पालकांनी औषधाच्या जाहिरातीवर किंवा केवळ औषधाच्या नावावर विश्वास न ठेवता पॅकेटवरील सूचना वाचणे आवश्यक आहे. विशेषत लहान मुलांसाठी औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

दुष्परिणामांकडे दुर्लक्ष नको -
संबंधित औषधांतील घटकांचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. काही बालकांमध्ये औषध घेतल्यानंतर जास्त सुस्ती, अस्वस्थता किंवा चिडचिडेपणा जाणवू शकतो. काही गंभीर परिस्थितींमध्ये श्वसनक्रिया मंदावणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा तीव्र धाप लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.म्हणूनच औषध दिल्यानंतर मुलाच्या प्रकृतीत असामान्य बदल दिसून आल्यास पालकांनी विलंब न करता वैद्यकीय मदत घ्यावी.

दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप टाळा -
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप स्वतहून देणे टाळावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. या वयातील मुलांचे शरीर आणि अवयव नाजूक असतात. त्यामुळे काही औषधांतील तीव्र घटकांचा शरीरावर अनावश्यक ताण पडू शकतो.सर्दी-खोकला झाला म्हणून प्रत्येक वेळी कफ सिरप देणे आवश्यक नसते. अनेकदा साध्या संसर्गामुळे होणारी सर्दी-खोकला काही काळात आपोआप कमी होऊ शकतो. मात्र, लक्षणे तीव्र असल्यास किंवा बालकाच्या प्रकृतीत बिघाड जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सर्दी-खोकल्यासाठी तुलनेने सुरक्षित उपाय -
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना साधी सर्दी किंवा नाक बंद होण्याचा त्रास असल्यास सलाईन नेसल ड्रॉप्स म्हणजे मिठाच्या पाण्याचे थेंब, पुरेसे द्रवपदार्थ देणे आणि डॉक्टरांनी योग्य ठरविल्यास वाफ देणे यांसारखे उपाय उपयोगी ठरू शकतात. मात्र, मुलाचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन कोणता उपाय करायचा, हे ठरवणे महत्त्वाचे आहे.

पालकांनी काय काळजी घ्यावी -
चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी-खोकल्याची सिरप देऊ नये.
औषधाच्या पॅकेटवरील वयोमर्यादा आणि इशारे काळजीपूर्वक वाचावेत.
औषधातील घटकांची माहिती तपासावी.
डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त औषध देऊ नये.
मोठ्या व्यक्तींसाठी असलेली औषधे मुलांना स्वतहून देऊ नयेत.
औषध दिल्यानंतर मुलाला जास्त सुस्ती, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर असामान्य लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणे टाळावे -
लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला हा संसर्गाशी लढण्याचा नैसर्गिक मार्ग असतो. प्रत्येक वेळी कफ सिरप देणे योग्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणे पूर्णपणे टाळावे. डॉ. प्रदीप गुजर, बालरोगतज्ज्ञ केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. सर्दी-खोकल्यासारखी सामान्य लक्षणे दिसली तरी स्वतहून औषध देण्याऐवजी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि औषधाच्या लेबलवरील वयोमर्यादा काटेकोरपणे पाळणे, हाच बालकांच्या सुरक्षिततेचा योग्य मार्ग ठरणार आहे.





  Print






Related Photos