महत्वाच्या बातम्या

 पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांसाठी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करणे, वगळणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांवर २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ऑफलाईन अथवा ऑनलाईन अर्जांवर कार्यवाही करण्यात येऊ नये, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने दिल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील औरंगाबाद, पुणे व नागपूर विभाग पदवीधर तसेच पुणे व अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील तरतुदीनुसार मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण सुरू आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदार यादीतील नाव समावेश, वगळणी किंवा दुरुस्तीसाठी प्राप्त अर्जांवर नियमानुसार आवश्यक नोटीस कालावधी लक्षात घेता २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राप्त अर्जांवर ६ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही करता येणार आहे.

२६ सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही स्वरूपातील अर्जावर कार्यवाही करू नये. तसेच ६ ऑक्टोबर २०२६ नंतर मतदार यादीमध्ये कोणतीही सुधारणा किंवा बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






Related Photos