अवघ्या तासभराच्या पावसात खरबी जि.प. शाळा जलमय : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील खरबी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अवघ्या एका तासाच्या मुसळधार पावसाने पाणी निचऱ्याच्या अपुऱ्या व्यवस्थेचे गंभीर वास्तव समोर आणले. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण आवार जलमय झाले.
स्वयंपाकगृहात तसेच पोषण आहारासाठी ठेवलेल्या धान्यसाठा कक्षात पाणी शिरल्याने शिक्षकांची मोठी धावपळ उडाली, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र, शिक्षक आणि पालकांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या संरक्षण भिंतीत पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी केवळ लहान व्यासाचा एकच पाइप बसविण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा वेग आणि पाण्याचे वाढलेले प्रमाण या पाइपच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने काही मिनिटांतच पाण्याचा निचरा थांबला आणि संपूर्ण शाळा परिसर जलमय झाला. परिणामी, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पालक छत्र्या घेऊन शाळेत पोहोचले. शिक्षक आणि पालकांनी समन्वय साधत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर काढून त्यांच्या घरी पोहोचविले. त्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
दरम्यान, साचलेले पाणी शाळेच्या स्वयंपाकगृहात तसेच पोषण आहारासाठी ठेवलेल्या धान्यसाठा कक्षात शिरल्याने शिक्षकांची एकच धावपळ उडाली. धान्य आणि इतर साहित्य वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. अन्यथा शालेय पोषण आहार योजनेलाही फटका बसण्याची शक्यता होती.
या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पालकांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य व निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सक्षम व्यवस्था न करणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी शाळा परिसरातील जलनिचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, संरक्षण भिंतीत मोठ्या क्षमतेची जलवाहिनी बसवावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे शाळांमधील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेचा आणि स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
News - Bhandara




Petrol Price




