भरधाव ट्रेलरची पादचाऱ्याला धडक : अनोळखी इसम जागीच ठार, चालक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती येथील सुमठाना चौक परिसरात भरधाव ट्रेलरने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन न थांबविता घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुमठाना येथील ठेकेदार विवेक सुरेश मिसाळ हे आपल्या कुटुंबासह वणी येथे नातेवाईकांकडे गेले होते. ते मित्राच्या कारने परत येत असताना २० जून रोजी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजताच्या सुमारास सुमठाना चौकाजवळ पोहोचले. त्यावेळी चंद्रपूरकडून वरोरा दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या एमएच-४० सीएम-५७८५ क्रमांकाच्या ट्रेलरने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगात धडक दिली.
धडकेनंतर ट्रेलर चालकाने वाहन न थांबविता घटनास्थळावरून पलायन केले. अपघात इतका भीषण होता की ट्रेलर मृतकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर विवेक मिसाळ यांनी तात्काळ ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच भद्रावती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीची ओळख तात्काळ पटू शकली नसल्याने त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र केदारे करीत आहे
News - Chandrapur




Petrol Price




