सरणासाठी लाकूडच उपलब्ध नसल्याने जेसीबीने खड्डा खोदून अंत्यसंस्कार : नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथील हृदयद्रावक घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुःखाच्या प्रसंगीही मूलभूत सुविधांचा अभाव किती वेदनादायी ठरू शकतो, याचा प्रत्यय नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथे शुक्रवारी आला. गावातील युवराज मेश्राम यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले सरणाचे लाकूड उपलब्ध न झाल्याने अखेर जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीत खड्डा खोदून अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेमुळे उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थ भावुक झाले.
माहितीनुसार, युवराज मेश्राम यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी सरणाचे लाकूड मिळविण्याचा प्रयत्न केला. परिसरात तसेच तळोधी बाळापूर येथील लाकूड डेपोमध्ये चौकशी केली असता तेथेही लाकडाचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणांहून लाकूड आणण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले.
पर्याय नसल्याने ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीत खड्डा खोदला आणि त्यामध्ये युवराज मेश्राम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने कुटुंबीयांसह उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तळोधी येथील सरण लाकूड डेपोमध्ये गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड उपलब्ध नाही. याबाबत वन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांनी सांगितले की, ही समस्या केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील अनेक स्मशानभूमींमध्ये सरणासाठी आवश्यक लाकडाचा नियमित साठा उपलब्ध नसतो. परिणामी, दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांना शेवटच्या विधीसाठीही धावपळ करावी लागत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




