महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अवैध मद्यवाहतुकीचा पर्दाफाश : तेलंगणातील दोघांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे मार्गाने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे वर्धा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मालाची किंमत १६ हजार २५० रुपये आहे.

आज, १९ जून २०२६ रोजी सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ च्या मागील बाजूस असलेल्या जनरल डब्याजवळ संशयितांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोपी भरत ओदेलू लाल्लाकुल्ला (वय २६ वर्ष) व सत्ताम्मा लाल्लाकुल्ला (वय ५१ वर्ष), दोघेही रा. बेलमपल्ली, जि. आदिलाबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देशी दारूचा साठा आढळून आला.

आरोपी भरत याच्याकडील बॅग व थैलीची तपासणी केली असता त्यामध्ये ९० मिलिलिटर क्षमतेच्या रॉकेट संत्रा या ब्रँडच्या २०० सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. या मद्यसाठ्याची किंमत ८ हजार २२० रुपये आहे. तसेच आरोपी सत्ताम्मा हिच्याकडील दोन पिशव्यांमधून ९० मिलिलिटर क्षमतेच्या राकेट संत्रा या ब्रँडच्या २०० सीलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत ८ हजार ३० रुपये आहे.

दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या देशी दारूची एकूण किंमत १६ हजार २५० रुपये असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) व ६६ (ब) अन्वये अपराध क्रमांक ३३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, प्रभारी अधिकारी, रेल्वे पोलीस ठाणे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई दर्शन झाडे, पोलीस शिपाई राजेश ठाकरे, पंकज भांगे, राजेंद्र फटींग तसेच महिला पोलीस शिपाई कीर्ती मिश्रा यांनी केले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नायक संजय सुखदेवे करीत आहेत. रेल्वे मार्गाने होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मद्यतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos