३१ जुलैपूर्वी पिकविमा नोंदणी करा : शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६-२०२७ अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कल्याणी औटी यांनी केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सिंदेवाही तालुक्यात भात (तांदूळ) हे पीक अधिसूचित करण्यात आले असून या पिकासाठी हेक्टरी ६५ हजार रुपये संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांचा विमा हप्ता हेक्टरी १,३०० रुपये इतका आहे.
पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य असून, डिजिटल पीक सर्वेक्षणानुसार पिकांची नोंद बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकरी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) किंवा अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. तसेच, योजनेतून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीपूर्वी संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट, वादळ तसेच इतर नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत पीक विमा नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कल्याणी औटी यांनी केले आहे.
पीक विमा नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण अथवा अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदेवाही किंवा संबंधित पीक विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




