१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका : पालिका शिक्षणाधिकाऱ्यांच्या सर्व बोर्डांच्या शाळांना सूचना


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका पुन्हा एकदा नववी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी, शाळास्तरावर होणाऱया प्रिलियम परीक्षेसाठी शाळेत बोलावू नका, अशा सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी एसएससीसह सर्व केंद्रीय बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी महापालिकेने केवळ केंब्रिज शिक्षण मंडळाच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शाळेत बोलावण्यास परवानगी दिली होती, मात्र मुंबई विभागातील कोरोनाची परिस्थिती पाहता पूर्वपरीक्षा व इतर शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थ्यांना पुढील आदेशापर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावू नये, असे आदेश पालकर यांनी जारी केले आहेत.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाने एसएससीसह सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, केंब्रिज बोर्डाच्या शाळांसाठी लेखी सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मुंबई परिसरातील शाळा नववी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्यक्ष शाळेत बोलावित असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत होत्या.
महापालिका परिक्षेत्रातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश असतानाही काही शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले जात आहे, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालकर यांनी दिला आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना केवळ बोर्डाकडून घेण्यात येणाऱया लेखी तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शाळेत हजर राहण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त पुढील आदेशापर्यंत मुंबई परिसरातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद राहणार आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2021-03-17


Related Photos