महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत पानठेल्यावर धडक कारवाई : प्रतिबंधित खर्रा, तंबाखू आणि सुपारी जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने भद्रावती शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाई करत एका पानठेल्यावरून खर्रा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त केला. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दि. १८ जून रोजी बसस्थानकासमोरील नागपूर रोडवरील बापू कोलड्रिंक्स पानठेला अँड कन्फेक्शनरी या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

कारवाईत एक किलो खर्रा (किंमत सुमारे १ हजार रुपये), सात किलो खुली सुगंधित तंबाखू (किंमत ७ हजार रुपये) तसेच खर्रा तयार करण्यासाठी वापरली जाणारी २५ किलो सुपारी (किंमत १२ हजार ५०० रुपये) असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी साठ्यातील पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून संपूर्ण साठा ताब्यात घेतला आहे.

तपासादरम्यान दुकान मालक अतुल सुरेश कोल्हे (वय ४०), रा. श्रीरामनगर, भद्रावती यांच्याकडे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी असतानाही हा साठा आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(अ), ५९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सुगंधित तंबाखू व खर्रा यांसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग, मुखरोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईमुळे भद्रावती शहरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos