महत्वाच्या बातम्या

 कत्तलीसाठी डांबून ठेवलेले सात गोवंशांची बल्लारपूर पोलिसांकडून सुटका : एक आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात कत्तलीच्या उद्देशाने सात गोवंशांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याचा प्रकार बल्लारपूर पोलिसांनी उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सात गोवंशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. कलीम गणी कुरेशी (वय ३४), रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.

बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी शहरात गस्त घालत असताना गुप्त माहितीदारा मार्फत राजेंद्र प्रसाद वॉर्ड परिसरातील एका घरात कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात आरोपी कलीम गणी कुरेशी ३४ वर्षे, व्यवसाय खटीक, रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, बल्लारपूर याच्या घराची पाहणी केली असता तेथे मटण कापण्यासाठी वापरण्यात येणारा लाकडी खोड, तीन धारदार सुऱ्या तसेच दोरीने बांधून ठेवलेले सात गोवंश आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपीने हे गोवंश कत्तलीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या सातही गोवंशांची अंदाजे किंमत ३९ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी सातही गोवंश ताब्यात घेऊन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर (जि. चंद्रपूर) येथे पोहोचविण्यात आले. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपी कलीम गणी कुरेशी याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा क्रमांक ७७३/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड तसेच डी.बी. पथकातील पोहवा संतोष पंडीत, लालु यादव, पंकज शिंदे, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, भास्कर चिंचवलकर, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं वैभव गाडगे, महेश कुकुडकर, शरदचंद्र कारूष, मिलींद आत्राम, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos