महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन; अभियंत्यावर कारवाईची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत विविध मागण्यांसाठी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच कोसळल्याच्या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

लांजेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बुधवार, १७ जून २०२६ रोजी हे आंदोलन पार पडले. आंदोलनकर्त्यांनी अभियंता साखरवाडे यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला चप्पल व जोडे मारून निषेध नोंदवला तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण रस्ते व पूल बांधकाम तसेच दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून प्रत्यक्ष काम न करता देयके काढण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 50 कोटी रुपयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकनेते तथा डीपीडीसीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याआधीही विविध आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले, असे त्यांनी नमूद केले.

तसेच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे कार्यालयातील वातावरण असुरक्षित झाल्याचा दावा करण्यात आला.

या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.





  Print






News - Gadchiroli




Related Photos