महत्वाच्या बातम्या

 जुन्या वादातून घरात शिरून वृद्धाची बेदम मारहाण करून हत्या : गोंदियातील धक्कादायक घटना, ३ आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : जुन्या वादाच्या रागातून घरात शिरून एका ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डब्बेटोला गावात घडली. ही घटना रविवारी (१४) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

मुन्नीलाल ताल वारलू कटरे (६० वर्ष, रा. डब्बेटोला) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते गावातच चहा आणि बिस्किटांचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करायचे.

वादाची पार्श्वभूमी -
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नीलाल कटरे यांच्या शेजारी राहणारी मनीषा रवी मेश्राम हिला मूलबाळ नसल्याच्या कारणावरून यापूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये काही वेळा वाद झाले होते. या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये बोलचाल पूर्णपणे बंद होती. रविवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास याच जुन्या कारणावरून मुन्नीलाल कटरे आणि मनीषा मेश्राम यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक झाली.

घरात शिरून बेदम मारहाण -
भांडणानंतर मुन्नीलाल हे वाद टाळण्यासाठी आपली बहीण श्यामकला कटरे यांच्या घरी निघून गेले. मात्र, काही वेळातच संतापलेले आरोपी रवी लक्ष्मण मेश्राम (३१), संजय लालाजी मेश्राम (३८), मनीषा रवी मेश्राम (२८) आणि अक्षय हेतराम मेश्राम (२५) हे चौघेही श्यामकला कटरे यांच्या घराबाहेर पोहोचले. त्यांनी मुन्नीलाल यांना शिवीगाळ करत घराबाहेर यायला सांगितले.

मुन्नीलाल भीतीने बाहेर न आल्यामुळे आरोपी जबरदस्तीने घरात शिरले आणि त्यांनी मुन्नीलाल यांना ओढत घराबाहेर आणले. यावेळी मुन्नीलाल यांची बहीण श्यामकला आणि त्यांच्या वृद्ध आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की व मारहाण केली.

बैलगाडीच्या लाकडी फळीने केला हल्ला -
आरोपींनी मुन्नीलाल यांना घरासमोरील सिमेंट रस्त्यावर नेऊन आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता, अंगणात उभ्या असलेल्या बैलगाडीची लाकडी फळी काढून आरोपींनी मुन्नीलाल यांच्या छातीवर, पोटावर, कंबरेवर आणि पायावर वारंवार गंभीर प्रहार केले. मुन्नीलाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

उपचारापूर्वीच मृत्यू -
गंभीर जखमी अवस्थेत मुन्नीलाल यांना बहिणीच्या घरात आणण्यात आले. कुटुंबीयांनी तातडीने गावातील डॉक्टर गोविंद रहांगडाले यांना पाचारण केले. मात्र, सकाळी १० वाजताच्या सुमारास तपासणीअंती डॉक्टरांनी मुन्नीलाल यांना मृत घोषित केले.

तीन आरोपींना अटक, आज न्यायालयात हजर करणार -
या घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तत्परता दाखवत रविवारी सायंकाळीच मुख्य तीन आरोपी - रवी लक्ष्मण मेश्राम, संजय लालाजी मेश्राम आणि अक्षय हेतराम मेश्राम यांना अटक केली आहे.

सर्व आरोपींविरुद्ध भादंवि (भारतीय दंड संहिता) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे डब्बेटोला गावात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






News - Gondia




Related Photos