महत्वाच्या बातम्या

 आदिवासी आश्रम शाळा वर्ग ४ कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या प्रकल्प गडचिरोली शिष्टमंडळाने आज प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या आणि निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी आदिवासी विकास विभागाने व्हिसी (VC) द्वारे बदली धोरण राबविण्याचे ठरविले आहे. मात्र, या नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः आजही अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी समस्यांमुळे बदली प्रक्रियेत अडथळे येत आहेत. तसेच, स्वयंपाकी संवर्गातील कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्यांमध्ये स्वगावी जावे लागते, त्यामुळे वर्ग ४ कर्मचाऱ्यांना या धोरणामुळे अयोग्य फटका बसू नये, यासाठी मध्यस्थी मार्ग काढण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.

शाळा व वसतिगृहांमध्ये अत्यल्प प्रमाणात कर्मचारी असल्यामुळे कामाचा प्रचंड ताण असल्याचे आणि त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद केले गेले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, चालू शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसापासून पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

विद्यार्थी प्रवेश व भरती प्रक्रियेत लक्षांक मुद्यांवर वर्ग ४ कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होऊ नये, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. तसेच, अनेक कर्मचाऱ्यांना १०–१५ वर्षांहून अधिक सेवा असूनही पदोन्नती दिलेली नाही, त्यामुळे लवकरच पदोन्नतीसंबंधी निर्णय घेण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

याशिवाय, अनेक ठिकाणी वर्ग ४ कर्मचाऱ्यांना गणवेश कापड अद्याप उपलब्ध नाही, त्यामुळे ताबडतोब गणवेश कापड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. स्वयंपाकी कर्मचाऱ्यांच्या २०१९ ते २०२३ पर्यंत अर्जित रजेचे रोखीकरण करून आर्थिक मोबदला देण्याबाबतही चर्चा झाली, ज्यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी कुणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले.

निवेदन सादर करताना लालाजी मडावी (राज्य कमिटी उपाध्यक्ष), प्रविण मडावी (राज्य कमिटी कार्याध्यक्ष), धनंजय टेंभुर्णे (प्रकल्प अध्यक्ष), अनिल कोडाप (कार्याध्यक्ष), प्रशांत सिडाम (सचिव), खुशाल गेडाम (उपाध्यक्ष), छाया मडावी (राज्य कमिटी सदस्य), अवि कोहळे (मार्गदर्शक), मंजु मडावी आणि दिलीप गेडाम उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos