धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकलून खून : सीसीटीव्हीमुळे धक्कादायक प्रकार उघड, आरोपीचा शोध सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया-वडसा मेमू लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा धावत्या रेल्वेतून जाणीवपूर्वक खाली ढकलून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले जात होते. मात्र, रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितू विनायक धमगाये (वय ४३, रा. गणखैरा, ता. गोरेगाव) या नेहमीप्रमाणे गोंदिया-वडसा मेमू लोकल (क्रमांक ६८८०६) मधून प्रवास करून घरी परतत होत्या. बुधवारी ९ सायंकाळी सुमारे ७.०५ ते ७.३० वाजताच्या दरम्यान ग्राम गणखैरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोल क्रमांक १००९/१५ समोरील रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली.
त्या दिवशी कामावरून घरी परतण्यास उशीर झाल्याने त्यांचा भाऊ मंगेश विनायक धमगाये यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर गणखैरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारी रितू धमगाये यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान शुक्रवारी १० रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. या फुटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती रितू धमगाये यांचा हात जबरदस्तीने पकडून धावत्या मेमू लोकलच्या डाव्या बाजूच्या दरवाजातून बाहेर ढकलत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या दृश्यामुळे अपघाती मृत्यूचे गूढ उलगडले असून हा पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीचे वर्णन जाहीर -
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे वर्णन जाहीर केले आहे. आरोपीचा बांधा मजबूत असून त्याचा वर्ण सावळा आहे. त्याचे केस काळे असून त्याने काळा टी-शर्ट, काळी पँट परिधान केली आहे. गळ्यात केशरी रंगाचा दुपट्टा असून चेहऱ्यावर दाढी-मिशी आहे. आरोपीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके कार्यरत केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
News - Gondia




Petrol Price




