महत्वाच्या बातम्या

 पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा : ऑरेंज अलर्ट जारी


- शहरात ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस कायम; पर्यटनस्थळी जाणाऱ्यांना प्रशासनाचे सावधगिरीचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे शहर व परिसरात ३१ जुलैपर्यंत अधूनमधून उघडीप, ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सकाळी काही काळ उघडीप मिळाल्यानंतर दुपारी हलक्या सरी कोसळल्या, तर रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळीही शहरात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. रविवारी शहरात सरासरी ३ ते ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रविवारी पुणे शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सोमवारी २७ आणि मंगळवारी २८ तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असली, तरी शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र घाट विभागातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी; पर्यटकांनी दक्षता बाळगावी -
सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टेकड्या, धबधबे, दऱ्या आणि जंगल परिसर हिरवाईने नटले आहेत. त्यामुळे लोणावळा, माळीण, ताम्हिणी, भोरसह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र अनेक ठिकाणी चिखल, घसरडे रस्ते, पाण्याचा वाढलेला प्रवाह तसेच झाडे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -
गिरिवन - ३६.० मिमी, कुरंवडे - २४.५ मिमी, माळीण - १५.० मिमी, तळेगाव - १२.० मिमी, भोर - ९.० मिमी, दौंड - ८.० मिमी, निंमगिरी - ५.० मिमी, चिंचवड - ३.५ मिमी, दापोडी - ३.० मिमी, पाषाण - ३.० मिमी, राजगुरुनगर - ३.० मिमी, बल्लाळवाडी - २.५ मिमी, एनडीए - १.५ मिमी, दुडुळगाव - १.५ मिमी, शिवाजीनगर - १.२ मिमी, कोरेगाव पार्क - १.० मिमी, शिरूर - ०.५ मिमी दरम्यान, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, नागरिकांनी नदी, ओढे, धबधबे आणि घाट परिसरात अनावश्यक वावर टाळावा तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos