भरपावसात जेन झी रस्त्यावर : अनेक पक्ष, संघटनांचा पाठिंबा


- दिल्लीतील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या पोलिस लाठीहल्ल्याचा तसेच पेपरफुटीच्या घटनांचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गुरुवारी भंडाऱ्यात युवकांनी भव्य मोर्चा काढला. भंडारा बंदच्या आवाहनासह निघालेल्या या मोर्चाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दुपारी १२ वाजता लालबहादूर शास्त्री चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आलेले तरुण-तरुणी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या युवकांनी वंदे मातरम्, इन्कलाब जिंदाबाद आणि संविधान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. काही युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाही हातात घेतल्या होत्या. व्यापाऱ्यांनी दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले
आंदोलनात विविध पक्ष, संघटनांचा सहभाग -
मोर्चात काँक्रोच जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भीम आर्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटना, रिपाइं आठवले पीरिपा कवाडे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय कम्युनिस्ट पार्टी, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, एकलव्य सेना, महिला अधिकार सामाजिक संघटना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महिला राजसत्ता आंदोलन, संजीवन सखी संघ, आझाद समाज पार्टी कांशीराम भारतीय बौद्ध महासभा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, बीआरएसपी आणि सार्वभौम युवा मंच आदी संघटनांचा सहभाग होता.
भरपावसातही उत्साह कायम -
मोर्चा सुरू झाला तेव्हाही पाऊस सुरूच होता. मात्र, आंदोलकांनी रेनकोट आणि छत्र्यांचा आधार घेत सहभाग कायम ठेवला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने मोर्चात सहभाग नोंदविला.त्रिमूर्ती चौकात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर झालेल्या सभेत युवकांनी जोशपूर्ण भाषणे केली. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. भरपावसातही तरुणांचा उत्साह आणि शिस्त लक्षवेधी ठरली.
भंडारा बंदला संमिश्र प्रतिसाद -
आंदोलकांनी दिलेल्या भंडारा बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोर्चाच्या मार्गावरील काही दुकाने व प्रतिष्ठाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली; मात्र नंतर ती पुन्हा सुरू झाली. काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली, तर काही शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित कामकाज सुरू होते.
मोर्चादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
पवनीत सर्वपक्षीय निदर्शने -
पवनी : दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पवनी शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोहन पंच, धर्मेंद्र नंदरधने, शंकरराव तेलमासरे, मोहित मोहरकर, श्रावण लांजेवार, सय्यद तबरेज, मीना जिभकाटे, नितीन तलमले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.
साकोली बंदला प्रतिसाद -
साकोली : दिल्लीतील लाठीहल्ला, पेपरफुट प्रकरण आणि केंद्र सरकारच्या कथित दबावतंत्राच्या निषेधार्थ शहरवासीयांनी मोर्चा काढून बंद यशस्वी केला. बसस्थानक येथून सुरू झालेला मोर्चा जुन्या तहसील कार्यालयापर्यंत गेला. त्यानंतर झालेल्या सभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नायब तहसीलदार श्यामराव शेंडे यांच्यामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
News - Bhandara




Petrol Price




