महत्वाच्या बातम्या

 राजुरात भीषण अपघात : कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी घडलेल्या भीषण रस्ता अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतकाचे नाव विशाल केशव जीवतोडे २८ वर्ष रा. विरूर, ता. राजुरा असे असून, तो दुचाकी क्रं एमएच ३४ बीजे ११३३ वरून तहसील कार्यालयाकडून पंचायत समितीकडे जात होता. दुपारी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रं केए ६३ ए ६७६८ ने दुचाकीच्या हँडलला जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका भीषण होता की दुचाकी सुमारे १५ फूट फरफटत गेली. दरम्यान, विशाल जीवतोडे यांचा तोल जाऊन ते कंटेनरच्या मागील चाकाखाली आले. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी पाठलाग करून पंचायत समिती परिसरात कंटेनर अडविला आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. राजुरा पोलिसांनी कंटेनर जप्त करून चालक कमलेश भोजराज गुर्जर २५ वर्ष रा. नंदराई, राजस्थान याला अटक केली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

विशाल जीवतोडे हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विरूर स्टेशन येथे त्याचा कॅटरिंग व्यवसाय असून, कामानिमित्त तो राजुरा येथे आला असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे जीवतोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विरूर परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos