विसापूर आरोग्य शिबिरात ३६३ नागरिकांची तपासणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विसापूर येथील वस्ती व टेकडी परिसरात आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ३६३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून ६० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत, तर ११२ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, नाक-कान-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आणि श्वसनविकार अशा विविध आजारांवरील तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान नोंदणीकृत ३६३ रुग्णांपैकी ६० रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसह विविध उपचारांसाठी पात्र ठरविण्यात आले. या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सावंगी (मेघे) येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच ११२ लाभार्थ्यांना पुढील चार दिवसांत मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ग्रामीण भागातील एकही नागरिक उपचाराअभावी वंचित राहू नये, या उद्देशाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पुढील एक महिनाभर विविध ठिकाणी अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.
३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचा लाभ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित विविध आरोग्य उपक्रमांमधून आतापर्यंत सुमारे ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १५ हजारांहून अधिक रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याच्या या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळत असून ग्रामीण भागात या शिबिरांचे स्वागत होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




