लाल मखमली माईट (गोसावी) गायब : दुर्मिळ जीवाच्या अस्तित्वावर गंभीर संकट


- पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी; निसर्ग अभ्यासक डॉ. कैलास निखाडे यांनी व्यक्त केली चिंता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : मान्सूनच्या पहिल्या पावसासोबत कोरड्या जमिनीतून बाहेर पडणारा, लालभडक रंगामुळे आणि मखमलीसारख्या शरीरामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दुर्मिळ लाल मखमली माईट (Red Velvet Mite) यंदा भामरागड परिसरातून जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात गोसावी किंवा राणी कीडा म्हणून ओळखला जाणारा हा छोटासा पण पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जीव पावसाच्या कमतरतेमुळे अस्तित्वाच्या संकटाला सामोरा जात आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीतील ओलावा वाढल्यानंतर हे लाल मखमली माईट मोठ्या प्रमाणात मातीबाहेर येतात. जंगल परिसर, नदीकाठ, ओसाड जमीन तसेच नैसर्गिक अधिवास असलेल्या ठिकाणी त्यांचे दर्शन घडते. मात्र, यावर्षी पावसाने दिलेल्या ओढीमुळे आणि निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे जमिनीतील आवश्यक आर्द्रता निर्माण झाली नाही. परिणामी हा संवेदनशील जीव आपल्या नैसर्गिक चक्रानुसार मातीबाहेर पडलेलाच नाही.
ट्रॉम्बिडियम (Trombidium) वंशातील हा माईट प्रजातीचा जीव निसर्गातील एक आकर्षक घटक मानला जातो. मऊ, चमकदार लाल रंगाचे शरीर आणि अंगावर असलेल्या सूक्ष्म केसांमुळे त्याला मखमली स्वरूप प्राप्त होते. बालपणी अनेकांच्या कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय असलेला हा जीव आता दुर्मिळ होत चालला आहे.
उत्तर भारतातील काही भागांमध्ये लाल मखमली माईटला बिरबाहुटी या नावानेही ओळखले जाते. पारंपरिक औषधी उपयोगांमुळे काही ठिकाणी त्याची मागणी आणि खरेदी-विक्री केली जाते. मात्र, बदलते हवामान, अधिवासातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे या प्रजातीच्या अस्तित्वावर आधीच परिणाम होत होता. त्यातच यंदाच्या पावसाच्या कमतरतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक डॉ. कैलास निखाडे यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, लहानपणी आपण ज्या जीवांसोबत खेळत मोठे झालो, तो लाल माईट आता दुर्मिळ होत चालला आहे. यावर्षी तर पावसाअभावी हा जीव डोळ्यांनाही पडला नाही. पर्यावरणातील जैविक संतुलन राखण्यासाठी तसेच हानिकारक कीटकांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवण्यासाठी या माईटची महत्त्वाची भूमिका आहे. या जीवाला नामशेष होण्यापासून वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. शासनाने आणि निसर्गप्रेमींनी याच्या संवर्धनासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
लाल मखमली माईटचा जीवनक्रम हा जमिनीतील ओलावा, तापमान आणि वातावरणीय परिस्थितींवर अवलंबून असतो. मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच तो जमिनीबाहेर येतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीतील आर्द्रता घटली असून या जीवांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम झाला आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, अशा सूक्ष्म जीवांचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या आरोग्याचे संकेत मानले जाते. जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या जीवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. हवामान बदल, अनियमित पाऊस आणि अधिवासाचा ऱ्हास अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात पुढील पिढीला हा देखणा जीव केवळ पुस्तकांमध्ये किंवा छायाचित्रांमध्येच पाहावा लागण्याची शक्यता आहे.
लाल मखमली माईटचे संरक्षण म्हणजे केवळ एका छोट्या जीवाचे संवर्धन नसून, निसर्गातील जैविक संतुलन टिकवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




