बोर-धाम प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीसाठी २८४ कोटींचा निधी मंजूर : १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ

- जुन्या कालवा वितरण प्रणालीला मिळणार नवसंजीवनी; सेलू, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेलू तालुक्यातील बोर आणि धाम प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने तब्बल २८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुमारे ४० वर्षे जुन्या झालेल्या या कालवा प्रणालीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने सिंचन क्षमतेवर परिणाम झाला होता. आता दुरुस्तीच्या कामामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अधिक प्रभावीपणे पाणी पोहोचणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालवा दुरुस्तीच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये बोर प्रकल्पाच्या कालवा प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १४८ कोटी रुपये, तर धाम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कालवा प्रणाली जुनी आणि दोषपूर्ण झाल्याने अनेक ठिकाणी पाणी पाझरून वाया जात होते. परिणामी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याने सिंचन क्षेत्रावर परिणाम झाला होता. या दुरुस्ती कामामुळे कालव्यांची कार्यक्षमता वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे.
या कामाचा लाभ बोर प्रकल्पांतर्गत ७७ गावांना, तर धाम प्रकल्पांतर्गत ४८ गावांना मिळणार आहे. बोर प्रकल्पातील १२ हजार १९४ हेक्टर आणि धाम प्रकल्पातील ६ हजार ९० हेक्टर असे एकूण १८ हजार २८४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन पुनर्स्थापित होणार आहे. त्यामुळे सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊन उत्पादन वाढीस मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा गौरव -
यावेळी शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, रेशीम शेती तसेच तेल प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
युवा शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीला आधुनिक दिशा देत आहेत. अशा शेतकऱ्यांचा सन्मान ही आनंदाची बाब असून, यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असे आमदार कायंदे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात महिला शेतकरी सन्मान विधेयक मंजूर झाले असून, यामुळे महिला शेतकऱ्यांना योग्य सन्मान आणि ओळख मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सुधीर कोठारी, उमेश घाडगे आणि अशोक कलोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद उपरीकर यांनी केले.
कालवा दुरुस्तीचे भूमिपूजन; पथदिव्यांचे लोकार्पण -
कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते बोर प्रकल्पाजवळील कालवा वितरण प्रणाली दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच बोर प्रकल्प परिसरात पर्यटकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.
याशिवाय केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नवीन प्रयोगांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बोर व धाम प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीमुळे परिसरातील सिंचन व्यवस्थेला नवी ऊर्जा मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे.
News - Wardha




Petrol Price




