राजुरा पोलिसांचा सट्टा अड्ड्यावर छापा : दोघांवर गुन्हा ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ३ जुलै रोजी सायंकाळी शहरातील नाका क्रमांक ३ परिसरात सुरू असलेल्या अवैध सट्टा अड्ड्यावर धाड टाकून दोघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ५७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजुरा पोलीस ठाण्याचे पथक राजुरा शहरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, नाका क्रमांक ३ येथील अनुराधा गोदामामागील सार्वजनिक ठिकाणी टिनशेडमध्ये दोन इसम सट्टा पट्टीवर आकडे लिहून पैशांची हार-जीत लावून जुगार चालवत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
पोलीस पथक पोहोचताच तेथे उपस्थित काही जुगारी पळून गेले. मात्र सट्टा पट्टीवर आकडे लिहून पैशांची नोंद करणारे आरोपी शंकर विश्वनाथ पेटकर ५९ वर्ष रा. सास्ती आणि सोहेल समशेर पाहा २७ वर्ष रा. बामनवाडा राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून ४५ हजार ७७० रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, सट्टा पट्टीच्या आकडे लिहिलेल्या कागदी चिठ्ठ्या, बुक, कार्बन कॉपी कॅल्क्युलेटर, पेन, ताशपत्ते व जुगारासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण ५७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई राजुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोहवा चौधरी, पोअं शेख, रोहित यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




