महत्वाच्या बातम्या

 नवा मोबाइल खरेदी करून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू : एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : चंद्रपूर येथून नवा मोबाइल खरेदी करून दुचाकीने गावी परतत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना ५ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता आष्टी येथील वननाक्याजवळ घडली.

मृत युवकाचे नाव विशाल गोपाल सरकार (वय २४, रा. कालिनगर, ता. मुलचेरा) असे असून जखमी युवकाचे नाव चिरंजीव प्रदीप मिस्त्री (वय २२, रा. कालिनगर, ता. मुलचेरा) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सरकार व चिरंजीव मिस्त्री हे दोघे मोबाइल खरेदीसाठी चंद्रपूर येथे गेले होते. मोबाइल खरेदी करून ते दुचाकी क्रमांक एमएच ३३ एजी-८२४५ वरून आपल्या गावी परतत होते. दरम्यान, आष्टी येथील वननाक्याजवळ मालवाहू ट्रकांची रांग लागलेली होती. या वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढत असताना पाठीमागून आलेल्या एमएच ४० सीटी-७६३७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार विशाल सरकार याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला चिरंजीव मिस्त्री जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक हरिओम गोपाल सिंह (वय ४५, रा. बिसलपूर, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos