चार महिन्यांच्या उपचारांनंतर दोन नर वाघ पुन्हा जंगलात मुक्त

- सेमिनरी हिल्स ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील यशस्वी उपचार; वन विभागाकडून हालचालींवर ठेवणार विशेष लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर टीटीसी मध्ये तब्बल चार महिने उपचार आणि निगा राखल्यानंतर दोन नर वाघांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे. दोन्ही वाघ पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाने ही कारवाई केली असून, पुढील काही दिवस त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, दोन्ही नर वाघांचे वय सुमारे चार ते साडेचार वर्षे आहे. यापैकी एका वाघाला ७ मार्च रोजी पारशिवनी वनपरिक्षेत्रातून रेस्क्यू करण्यात आले होते. तर दुसऱ्या वाघाला देवलापार वनपरिक्षेत्रालगतच्या भागातून बचाव करून सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले होते.
रेस्क्यूच्या वेळी दोन्ही वाघ जखमी आणि अशक्त अवस्थेत होते. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करून वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या आरोग्याबरोबरच शारीरिक क्षमता आणि नैसर्गिक अधिवासात स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता विकसित होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार -
वन्यजीव तज्ज्ञांनी दोन्ही वाघांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवत आवश्यक वैद्यकीय उपचार, पोषण आणि नियमित तपासण्या केल्या. उपचारांनंतर दोन्ही वाघ पूर्णपणे निरोगी असून जंगलात स्वतंत्रपणे शिकार करून जगण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंजुरीनंतर अधिवासात मुक्तता -
दोन्ही वाघांना जंगलात सोडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे आवश्यक परवानगी मागण्यात आली होती. मंजुरी मिळाल्यानंतर वन विभागाच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने दोन्ही वाघांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले.
हालचालींवर राहणार बारकाईने नजर -
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेस्क्यू केलेल्या कोणत्याही वाघाला उपचारानंतर तात्काळ जंगलात सोडले जात नाही. त्याच्या आरोग्याची, शारीरिक क्षमतेची आणि नैसर्गिक वातावरणात जगण्याच्या क्षमतेची सखोल तपासणी केली जाते. सर्व निकषांवर तो सक्षम ठरल्यानंतरच त्याला पुन्हा जंगलात मुक्त केले जाते.
जंगलात सोडल्यानंतरही काही दिवस वन विभागाकडून दोन्ही वाघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांच्या वर्तनावर आणि आरोग्यावर सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे. या यशस्वी पुनर्वसनामुळे जखमी वन्यप्राण्यांच्या उपचार आणि संवर्धनाच्या दिशेने नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.
News - Nagpur




Petrol Price




