भुवनेश्वर येथे अभाविपची एकदिवसीय केंद्रीय कार्यसमिती बैठक संपन्न

- पश्चिम बंगालमध्ये लोकशाही मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी जनादेशाचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर
- शैक्षणिक विसंगती आणि शहरी नक्षलवादाविरोधात संघर्षासाठी अभाविप कटिबद्ध – डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / भुवनेश्वर : ओडिशातील महाप्रभू जगन्नाथ यांच्या पवित्र भूमी भुवनेश्वर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ची एकदिवसीय केंद्रीय कार्यसमिती बैठक शिक्षा ओ अनुसंधान विद्यापीठात उत्साहात पार पडली. या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसा, भीती आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा पराभव करून लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी जनतेने दिलेल्या जनादेशाचे अभिनंदन करणारा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
बैठकीचे उद्घाटन अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी, राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या बैठकीस देशभरातील विविध प्रांतांतील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान देशातील सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती, शिक्षण व्यवस्था, युवकांची भूमिका, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक आणि आर्थिक विषय, संघटनात्मक विस्तार तसेच समकालीन आव्हानांवर व्यापक चर्चा करण्यात आली. अभाविपच्या विविध उपक्रमांचा आढावाही घेण्यात आला.
यामध्ये स्क्रीन टाइम टू अॅक्टिव्हिटी टाइम अभियान, वंदे मातरम् १५० वर्ष, विद्यार्थी वसतिगृह सर्वेक्षण अभियान, प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्ष, आणीबाणी निषेधाची ५० वर्षे, श्री गुरु तेगबहादूर बलिदान दिवसाची ३५० वर्षे आणि संत शिरोमणी रविदासजी यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. अभियानात्मक, कार्यक्रमात्मक आणि संघटनात्मक विषयांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला.
हिंसा, भीती आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा पराभव करून लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी पश्चिम बंगालच्या जनतेचे अभिनंदन या विषयावरील ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी शिक्षण, सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक परिस्थिती आणि युवकांशी संबंधित विविध समकालीन विषयांवर सखोल चिंतन केले. या विषयांवर आगामी राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत पुढील चर्चा होऊन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी म्हणाले की, संघटनेची भावी दिशा निश्चित करण्यासाठी गतकाळाचा आढावा आणि वर्तमान परिस्थितीचे मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय कार्यसमितीची ही बैठक त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. द्वारका आणि श्रृंगेरी येथे आयोजित संघटनात्मक विचार बैठकांनी संघटनात्मक बळकटीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
ते पुढे म्हणाले, यावर्षी प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात आयोजित प्रबोधन कार्यक्रमांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या विचारसरणी आणि कार्यपद्धतीशी नव्याने जोडले आहे. अभाविपचे स्पष्ट मत आहे की भारताची शिक्षण व्यवस्था भारतीय तत्त्वज्ञान आणि मूल्यांवर आधारित असावी. यामुळे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक शिक्षण प्रणाली उभारण्याचा मार्ग मोकळा होईल.
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत करताना सांगितले की, भारत आज जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना अभाविप शहरी नक्षलवाद असो किंवा शिक्षण क्षेत्रातील विसंगती, त्याविरोधात रचनात्मक आंदोलन आणि संघर्षाच्या माध्यमातून कार्य करत आहे.
ते पुढे म्हणाले, तेलंगणातील शिष्यवृत्ती आंदोलन, नीट पेपर लीक प्रकरण, मुंबईतील पेपर लीकविरोधातील आंदोलन तसेच दिल्ली आणि पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभाविप सातत्याने कार्यरत असल्याचे उदाहरण आहे.
त्रिपुरातील जनजातीय विद्यार्थी संमेलन, ओडिशातील छात्रा संसद, तमिळनाडूमधील विधी विद्यार्थी परिषद तसेच मिशन साहसी अंतर्गत देशभरातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अभाविपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचे आणि विस्ताराचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसा, भीती आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत करून लोकशाही मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी जनतेचे अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ही बैठक राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
News - World




Petrol Price




