महत्वाच्या बातम्या

 कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा भीषण धक्का : चंद्रपुरात बाप-लेकाचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक घराघरांत कुलर, एसी आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर करीत आहेत. मात्र, उष्णतेपासून दिलासा देणारा कुलरच जीवावर बेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी सकाळी चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा जबरदस्त धक्का लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांची नावे वामन मांडवे आणि राहुल मांडवे अशी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही इंदिरानगर रेल्वे पटरीजवळ वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास वामन मांडवे हे घरातील सुरू असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकत होते. कुलर सुरू असतानाच त्यामध्ये पाणी टाकताना अचानक विजेचा तीव्र प्रवाह त्यांच्या शरीरात उतरला. जोरदार धक्का बसल्याने ते जागीच खाली कोसळले.

वडील खाली पडल्याचे पाहून मुलगा राहुल मांडवे हा घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे धावला. वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्याचाही विजेशी संपर्क आला आणि त्यालाही जोरदार विद्युत धक्का बसला. काही क्षणांतच दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण दुर्घटनेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर इंदिरानगर परिसरात मोठी गर्दी जमली होती. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मांडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुलर, पंखे, वॉटर पंप आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः विद्युत उपकरणे सुरू असताना त्यामध्ये पाणी टाकणे किंवा दुरुस्ती करण्याचे प्रकार जीवघेणे ठरू शकतात.

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, विद्युत सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos