केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी २२ जुलै रोजी केळी मूल्यसाखळी विकास व केळी उत्पादक शेतकरी यांची केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्रमांक एक येथे आयोजित केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रमात केळी लागवडीपासून ते विपणनापर्यंतच्या संपूर्ण मूल्यसाखळीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमामध्ये नागपूर येथील फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. विनोद राऊत हे केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पणन मंडळ नागपूरचे उपसरव्यवस्थापक राजेश सरोदे हे बाजार जोडणी व सुविधांसह वाहतूक योजना या विषयावर माहिती देणार आहेत.
याशिवाय जळगाव, अंजनगाव व वर्धा बाजारपेठांमधील केळीच्या दरातील फरक या विषयावर सचिन पावडे मार्गदर्शन करणार आहे. वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या प्रमुख सहभागातून मुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राद्वारे विविध बाजार समित्यांतील केळीच्या दरातील तफावत, बाजारपेठेतील संधी, शेतकऱ्यांसमोरील अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या परिषदेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, काढणीनंतरची हाताळणी, बाजारपेठेची उपलब्धता, वाहतूक सुविधा, मूल्यवर्धन तसेच अधिक लाभदायी विपणन व्यवस्थेबाबत माहिती मिळणार असून उत्पन्नवाढीस चालना मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ यांनी २२ जुलै रोजी आयोजित या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




