महत्वाच्या बातम्या

 दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त दीड लाखांचा मद्यसाठा नष्ट : दुर्गापूर पोलिसांची धडक कारवाई


- २५ गुन्ह्यांतील जप्त देशी-विदेशी मद्यावर जेसीबी फिरवून विल्हेवाट; अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध दारूविक्री व तस्करीविरोधातील मोहिमेला अधिक बळ देत दुर्गापूर पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील मद्यसाठ्याची कायदेशीर विल्हेवाट लावली. वर्ष २०२५ दरम्यान प्रोव्हिशन (दारूबंदी) कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या २५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला देशी व विदेशी दारूचा साठा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४३ हजार ४६० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा भटाडी परिसरातील रस्त्यालगतच्या जागेवर पंचांसमक्ष पार पडली. जप्त मद्यसाठ्यावर जेसीबी मशीनद्वारे चिरडून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर तरतुदींचे पालन करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आली.

या वेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रमोद बी. रजोते (वरोरा बीट क्र. २) यांच्यासह दुर्गापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, दुर्गापूर पोलीस हद्दीत अवैध दारूविक्री, साठवणूक आणि तस्करीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी गौरव कायंदेपाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, दुय्यम निरीक्षक प्रमोद बी. रजोते तसेच दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

अवैध मद्यव्यवसायाविरोधातील या निर्णायक कारवाईमुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos