अहेरी तहसील कार्यालयात विकास कामांचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथे मंगळवार, ५ मे रोजी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून विकास प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः कृषी, सिंचन, घरकुल, शिक्षण, रस्ते, वीज व आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गरजू व लाभार्थी कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कोणतीही अडचण येऊ न देता कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच, कामकाजात विलंब अथवा दुर्लक्ष होऊ नये, याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
अहेरी शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवून तातडीने सीमांकन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पांदण रस्ते तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे सुलभ होणार असून शेतीमालाच्या वाहतुकीसही मोठी मदत होणार आहे.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, शाखा प्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




