ब्रम्हपुरीत दुचाकीच्या डिक्कीतून २ लाखांची चोरी : बँकेतून पैसे काढल्यानंतरची घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरात दिवसाढवळ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी ३० एप्रिल रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास मारोती गजभिये (४८), रा. बोडेगाव, ता. ब्रम्हपुरी हे शेती व्यवसाय करतात. त्यांनी प्लॉट खरेदीसाठी ब्रम्हपुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून दुपारी सुमारे ३ वाजता २ लाख रुपये काढले. ही रक्कम कापडी पिशवीत ठेवून त्यांनी आपल्या एम एच ३४ ए डब्लू ४४७२ क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.
यानंतर ते बोडेगावकडे निघाले असता, आरमोरी रोडवरील दिप्ती ऑटोमोबाईल या गॅरेजमध्ये दुचाकीचे इंजिन ऑईल बदलण्यासाठी थांबले. दुपारी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास ऑईल बदलण्याचे काम सुरू असताना ते तेथेच उपस्थित होते. काम पूर्ण झाल्यानंतर पैसे देण्यासाठी ते काउंटरकडे गेले. परत दुचाकीकडे आल्यावर डिक्कीचे बटन उघडलेले दिसल्याने त्यांनी तपास केला असता, डिक्कीत ठेवलेली २ लाख रुपयांची कापडी पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले.
घटनेनंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली, तसेच गॅरेजमधील कर्मचाऱ्यांकडेही चौकशी करण्यात आली; मात्र रोकड मिळून आली नाही.
या प्रकारामुळे ब्रम्हपुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तपास सुरू केला असून, गॅरेज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती असून, लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




