नागपूर : भीषण उष्णतेमुळे वीज मागणी झपाट्याने वाढली, उत्पादन घटल्याने संकटाची चाहूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : एप्रिलच्या अखेरीस राज्यातील भीषण उष्णतेमुळे वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मागणी ३२,००० मेगावॉटच्या पुढे गेली असून, औष्णिक वीज केंद्रांतील तीन युनिट्स बंद पडल्याने आणि पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पांची क्षमता घटल्याने वीज उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी राज्यात वीज संकटाची चाहूल लागली असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
लोडशेडिंगची भीती नाही -
महावितरणने स्पष्ट केले आहे की, राज्यात लोडशेडिंग होणार नाही. वाढत्या मागणीवर सतत लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार अल्पकालीन वीज खरेदी केली जाईल.
उष्णतेमुळे आरोग्यविभागाची सतर्कता -
राज्यातील उष्णतेमुळे उष्माघाताचे ५५ रुग्ण नोंदले गेले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही संख्या फक्त १७ होती. या कालावधीत दोन मृत्यू नोंदले गेले, परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
पाणी व गॅस टंचाईचा वीज निर्मितीवर परिणाम -
२,५८०.२ मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांमधून फक्त २१४ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे, तर चार प्रकल्प पूर्णपणे बंद आहेत. उरण गॅस प्रकल्प (४३२ मेगावॉट क्षमता) गॅसअभावी फक्त २६८ मेगावॉट वीज निर्माण करू शकला.
राज्यात मागणी जास्त, उत्पादन कमी -
मंगळवारी राज्यातील वीज मागणी २९,५१ मेगावॉट होती, परंतु उत्पादन फक्त १७,८९८ मेगावॉट झाले. महाजेनकोच्या ताप विद्युत केंद्रांकडून ६,०८४ मेगावॉट वीज निर्माण झाली. कोराडी (६६० मेगावॉट), नाशिक (२१० मेगावॉट), चंद्रपूर (५०० मेगावॉट) येथील प्रत्येकी एक युनिट बंद होती.
राज्य प्रशासन वीजेच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत असून नागरिकांना वीजेचा वापर दक्षतेने करण्याचा सल्ला दिला जात आहे.
News - Nagpur




Petrol Price




