वर्धा जिल्ह्यात शेतातील विहीर खोदकामादरम्यान भीषण अपघात : मजुराचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील चोंडी शिवारात विहीर खोदकामाच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्रेनच्या टपाचा तार अचानक तुटून तो मजुराच्या अंगावर पडल्याने हा अपघात झाला.
मृत व्यक्तीचे नाव रामेश्वर प्रभाकर पाचभाई (वय ४९, रा. आकोली) असे आहे. रामेश्वर पाचभाई हे आपल्या सहकाऱ्यांसोबत विहीर खोदकामाचा ठेका घेऊन काम करत होते. चोंडी शिवारातील राजेंद्र झाडे यांच्या शेतात हे विहीर खोदकाम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीतील मलबा क्रेन मशीनच्या लोखंडी टपामध्ये भरून तो क्रेनच्या सहाय्याने वर पाठवला जात होता. याच वेळी अचानक क्रेनचा तार तुटला आणि वर जात असलेला लोखंडी टप थेट रामेश्वर पाचभाई यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सहकारी मजुरांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्थानिकांकडून प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
News - Wardha




Petrol Price




