महत्वाच्या बातम्या

 नागपुरात उद्यापासून नवतेजस्विनी महोत्सवाचा जागर : महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूरकरांसाठी एक खास पर्वणी चालून आली आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्री उद्या, २६ मार्चपासून लक्ष्मी नगर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ उद्या सायंकाळी ५:०० वाजता राज्यसभा सदस्य खासदार माया इवनाते यांच्या शुभहस्ते होणार आहे.

माविमंला २४ फेब्रुवारी रोजी ५१ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने महिला सक्षमीकरणाचा हा मोठा सोहळा २६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याचे दर्शन नागपूरकरांना घडणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे बचत गटांनी तयार केलेली शुद्ध घरगुती उत्पादने यात मिरची पावडर, हळद, विविध मसाले, लोणचे, पापड, डाळ यांसारख्या वस्तूंसह मातीची भांडी, आकर्षक बॅग्स, साड्या, ज्वेलरी, गारमेंट आणि हर्बल प्रॉडक्ट्सचे स्टॉल्स असणार आहेत. खवय्यांसाठीही ही एक मोठी मेजवानी ठरेल, कारण येथे झुणका-भाकर, पुरणपोळी, मटका रोटी यांसारख्या पारंपरिक पदार्थांपासून ते मोमोज, दाबेली, इडली, अप्पे आणि साबुदाणा वडा अशा चटपटीत पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

केवळ प्रदर्शनच नव्हे, तर दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यशस्वी महिला उद्योजिकांचा सत्कार, तेजस्विनी कन्या उपक्रम आणि बचत गटांमार्फत नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांचे सादरीकरण केले जाईल. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी नगर मैदान, आठ रस्ता चौक (अशोक हॉटेलच्या मागे) येथे भेट देऊन महिला उद्योजिकांचे मनोबल वाढवावे आणि त्यांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos