महत्वाच्या बातम्या

 मद्यधुंद महिलेचा भररस्त्यात धिंगाणा : सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा, गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनोना गावात एका महिलेने मद्याच्या नशेत सार्वजनिक रस्त्यावर असभ्य वर्तन करून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २२ जून रोजी पोलीस कंट्रोल रूमला एका महिलेने मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच डायल ११२ पथकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा एक ४४ वर्षीय महिला मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यावर असभ्य वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तिला समजावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मद्याच्या तीव्र नशेत असल्याने कोणत्याही सूचनांचे पालन करण्याच्या स्थितीत नसल्याचे आढळले.

यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत संबंधित महिला मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos