दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


पर्पल फेअर २०२६ उपक्रमाच्या उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम करण्याचे शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न आहे. यासाठी दिव्यांगांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
दिव्यांगांच्या कलागुणांना व क्षमतांना वाव देण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागांतर्गत अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था मुबंई यांच्या नियंत्रणाखालील समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र नागपूरच्या वतीने पर्पल फेअर २०२६ चे सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रतिभा भागवतकर, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्राचे संचालक प्रफुल शिंदे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार, डॉ.संजय गाठे, दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित होते.
शासनाच्यावतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यासोबतच जिल्हा परिषद शेष फंड अंतर्गत दिव्यांग विद्यार्थीनींना मागील महिन्यात किसान विकास पत्राचे वितरण करण्यात आले. अजून लवकरच २१ विद्यार्थींना किसान विकास पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १० लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली असून यासाठी ४५५ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. संस्थेने भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम दर तीन महिन्यांनी जिल्ह्यात घ्यावे, असा आशावाद पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
दिव्यांगांच्या कलागुणांना व क्षमतांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील मतीमंद, मुकबधीर, दिव्यांगांच्या १२ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमातून दिव्यांगांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळून एक व्यासपिठ मिळणार आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अद्यापर्यंत ६६२ दिव्यांगांनी युडीआयडी कार्ड काढलेले नाही. अशा दिव्यांगांनी तात्काळ कार्ड काढून घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पराग सोमण यांनी केले.
यावेळी दिव्यांग शाळांच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन स्टॉलची पाहणी केले.
यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते दोन दिव्यांगांना स्कुटीचे तसेच दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना ब्रेलकिट, तसेच विविध योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्याहस्ते दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील दिव्यांग शाळा, मतीमंद शाळा, मुकबधीर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




